बेळगाव : पतीकडून घरात डांबून ठेवून शारीरिक व मानसिक छळ सहन करणाऱ्या एका महिलेची आणि तिच्या दोन लहान मुलांची ‘अक्का पथका’ने सुटका केली असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

बेळगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या कारवाईची माहिती दिली. दिल्लीतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार महिला पोलीस ठाण्यामार्फत ‘अक्का पथका’चे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. पथकाने घराचा दरवाजा उघडून बंदिस्त अवस्थेत असलेल्या महिलेची व तिच्या मुलांची सुटका केली.

सदर महिला दिल्लीहून बेळगावमध्ये आली होती. मात्र तिच्या पतीने तिला घरातच डांबून ठेवत छळ केल्याचे समोर आले आहे. सुटका केल्यानंतर पीडितेवर वैद्यकीय उपचार करून तिला तात्पुरता आश्रय देण्यात आला.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी पतीविरुद्ध महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच महिला आणि तिच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची विमानाने दिल्लीला रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.