कंग्राळी (बु.) : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी (बु.) गावात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल चार दशकांनंतर होत असलेला ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव थाटामाटात सुरू झाला असून रथोत्सवानंतर सायंकाळी देवी गदगेवर विराजमान झाली.

मंगळवार दि. २८ रोजी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ५.४८ वाजता अक्षतारोपण सोहळा पार पडला. त्यानंतर बुधवारी दिवसभर गावातून पारंपरिक रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी देवी गदगेवर विराजमान झाल्यानंतर मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली.
मंदिराच्या आवारात उभारलेला भव्य मंडप आणि आकर्षक रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. देवीच्या दर्शनासाठी हजारो भक्त रांगेत उभे राहत असून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भाविक भक्तिभावाने प्रार्थना करत आहेत.

यात्रोत्सवाच्या निमित्ताने गावात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण पसरले आहे. पुढील सात दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.








