• लवादाने याचिका फेटाळली

बेळगाव : बेळगावमधील गांधीनगर परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या ‘जय किसान’ खासगी मार्केटला मोठा कायदेशीर धक्का बसला असून, परवाना रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका कर्नाटक प्रशासकीय लवादाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे या प्रकरणात मार्केट प्रशासनाला मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत वकील नितीन बोलबंदी यांनी सविस्तर माहिती दिली. परवाना रद्द झाल्यानंतर नियमानुसार ३० दिवसांच्या आत उच्च न्यायालयात दाद मागणे आवश्यक होते. मात्र संबंधितांनी ही मुदत उलटल्यानंतर कर्नाटक प्रशासकीय लवादाकडे धाव घेतली. यामुळे तांत्रिक कारणांवर लवादाने याचिका फेटाळून लावली. आता इतर कोणत्याही न्यायालयात गेले तरी हा निर्णय बदलण्याची शक्यता नसल्याचे बोलबंदी यांनी स्पष्ट केले.

यावेळी राजकुमार टोपण्णवर यांनी या प्रकरणात झालेल्या कथित राजकीय हस्तक्षेपावर जोरदार टीका केली. गांधी नगर येथे हे खासगी मार्केट स्थलांतरित करण्यासाठी स्थानिक भाजप आमदारांनी प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. तत्कालीन सरकारच्या काळात बेकायदेशीर मार्केटविरोधात वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नव्हती. मात्र सत्तांतरानंतर कृषी बाजार मंत्री व जिल्हा पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करून परवाना रद्द करण्यात यश मिळाले, असे त्यांनी सांगितले. हा विजय एपीएमसीतील व्यापाऱ्यांचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

टोपण्णवर यांनी पुढे सांगितले की, केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे मागे घेतल्यानंतरही स्थानिक पातळीवर हे मार्केट सुरू ठेवण्यात आले होते. सरकारी अनुदानातून उभारलेल्या हायटेक बाजार प्रांगणाकडे दुर्लक्ष करून खासगी हितसंबंधांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकताना सांगितले की, हे मार्केट एपीएमसी आवारात हलवण्यात आले असले तरी रविवारी छुप्या पद्धतीने व्यापार सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. ही अनधिकृत उलाढाल तातडीने थांबवून सर्व व्यवहार मुख्य प्रांगणातच व्हावेत, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेला रविवार बाजार अधिकृतपणे चालू ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.