• बेंगळूरू येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाचा निकाल

बेंगळूरू : धारवाड येथील भाजप नेते योगेश गौडा यांच्या हत्या प्रकरणात बेंगळूरू येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल देत माजी मंत्री तथा विद्यमान काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांच्यासह एकूण १६ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या खटल्यातील शेवटच्या आरोपींपैकी पोलीस अधिकारी चन्नकेशव टिंगरीकर याला ७ वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायाधीश संतोष गजानना भट यांनी प्रदीर्घ सुनावणीनंतर हा निकाल जाहीर केला.

जन्मठेप सुनावण्यात आलेल्या आरोपींमध्ये विक्रम, कीर्ती कुमार, संदीप सवदत्ती, विनायक कटगी, महाबळेश्वर होंगल उर्फ मुडका, संतोष सवदत्ती, एम. दिनेश, एस. अश्वथ, के.एस. सुनील, नझीर अहमद, शनवाज, के. नूथन, सी. हर्षित, चंद्रशेखर इंदिकलबुर्ग आणि इतरांचा समावेश आहे.

न्यायालयाने सर्व आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत जन्मठेप आणि कलम १२०(ब) (गुन्हेगारी कट) अंतर्गत ७ वर्षांची सक्त कैद अशी शिक्षा सुनावली आहे. दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रावर आधारित सुनावणीनंतर न्यायालयाने बुधवारी सर्व आरोपींना दोषी ठरवले होते. आज शिक्षा जाहीर झाल्याने प्रकरणाचा दीर्घ न्यायप्रक्रियेचा अध्याय पूर्ण झाला आहे.