बेळगाव : येळ्ळूरमध्ये ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटविल्यानंतर सीमाभागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये अखेर न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तब्बल १२ वर्षे चाललेल्या या न्यायालयीन लढ्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांचा येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र कुस्ती मैदानाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
या प्रकरणात कर्नाटकी पोलिसांनी येळ्ळूरमधील नागरिकांवर सात वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. मात्र न्यायालयीन प्रक्रियेनंतर सुमारे 250 जणांची निर्दोष मुक्तता झाली. या दीर्घ लढ्यात ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. शाम पाटील, ॲड. हेमराज बेंचण्णावर आदी वकिलांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रभावी बाजू मांडली.
या उल्लेखनीय कार्याबद्दल दुद्दापा बागेवाडी, प्रकाश अष्टेकर, दत्ता उघाडे, राजू पावले, अजित गोरल, भोला पाखरे, सतीश कुगजी यांच्या हस्ते संबंधित वकिलांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, हा न्यायालयीन लढा उभा करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुनराव गोरल, शिवाजी कदम, उदय जाधव, सतीश कुगजी, शामल जाधव, कमळा पोटे, रमेश धामणेकर आदींनी मोलाचे योगदान दिले. सत्कार समारंभाला रमाकांत कोंडुसकर, प्रमोद पाटील, तानाजी हलगेकर, आनंद कुंडेकर, जोतीबा चौगुले, सुरज गोरल, मधु पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.








