बेळगाव : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या निवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत असलेला महागाई भत्ता तात्काळ अदा करावा, या मागणीसाठी ऑल इंडिया बीएसएनएल पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात असोसिएशनच्या बेळगाव जिल्हा शाखेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सदस्य सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान प्रलंबित महागाई भत्ता त्वरित देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच शासनाच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

या संदर्भात माहिती देताना एआयबीडीपीएचे अखिल भारतीय उपाध्यक्ष रामू तटपटी यांनी सांगितले की, प्रलंबित महागाई भत्ता मिळावा यासाठी देशभरातील १२ संघटनांनी एकत्र येत हे आंदोलन उभारले आहे. महागाई भत्ता मंजूर झाल्यानंतर त्याचे वितरण तात्काळ करण्यात यावे, तसेच पूर्वीप्रमाणे तो पुनर्संचयित करावा, अशीही मागणी त्यांनी केली.

मागण्या मान्य न झाल्यास २५ एप्रिल रोजी धरणे सत्याग्रह आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी महागाई भत्ता वेळेवर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.