बेळगाव : बाजारात कोबीच्या दरात झालेल्या अचानक घसरणीमुळे हतबल झालेल्या कडोली (ता. बेळगाव) येथील एका शेतकऱ्याने स्वतःचे संपूर्ण पीक ट्रॅक्टरच्या सहाय्याने नष्ट केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थिती पुन्हा एकदा उजेडात आली आहे.

कडोली गावातील शेतकरी आप्पासाहेब देसाई यांनी कर्ज काढून दोन एकर जमिनीवर कोबीची लागवड केली होती. बियाणे, खते, सिंचन आणि मजुरीवर मोठा खर्च करून त्यांनी पीक उभे केले होते. पीकही चांगले आले होते; मात्र बाजारातील भाव कोसळल्याने त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. उलट पीक बाजारात नेण्याचा खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने त्यांनी पीक विकण्याऐवजी ट्रॅक्टर फिरवून संपूर्ण पिकाची नासधूस केली.

भाजीपाला पिकांना आधारभूत किंमत नसल्याने आणि बाजारातील दरातील अस्थिरतेमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. “आमच्या कष्टाला काहीच किंमत उरलेली नाही; पीक आले तरी नुकसानच,” अशी व्यथा आप्पासाहेब देसाई यांनी व्यक्त केली.

या घटनेनंतर उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा लक्ष वेधले गेले असून, शेतमालाला हमीभाव, बाजारपेठेचे नियमन आणि तातडीच्या मदत उपाययोजना राबवण्याची मागणी जोर धरत आहे.