बेळगाव : शहरातील रिक्षाचालकांना काही दिवसांपासून भेडसावणारी एलपीजी गॅसची टंचाई लवकरच दूर होणार आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.

बेळगावात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सध्या शहरात ७ सीएनजी पंपांवर पुरवठा सुरळीत चालू आहे, मात्र ६ एलपीजी पंपांपैकी काही खासगी पंपांवर पुरवठ्याची तात्पुरती अडचण जाणवत आहे. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मल्लिकार्जुन कलादगी यांची जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते लवकरच संबंधित घटकांची बैठक घेऊन ही अडचण दूर करतील.

व्यावसायिक वापराच्या एलपीजीबाबत रोज सुमारे ७०० सिलिंडर पुरवठा केला जात आहे. लहान व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हॉटेल असोसिएशनशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. बहुतांश हॉटेल व्यावसायिकांनी पर्यायी व्यवस्था केली असल्यामुळे सध्या मोठी समस्या उद्भवत नाही, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाच्या या तातडीच्या पावलांमुळे रिक्षाचालक आणि लहान व्यवसायिकांना दिलासा मिळणार आहे, अशी अपेक्षा आहे.