• काकती पोलिसांत एफआयआर दाखल

बेळगाव / प्रतिनिधी

सुळगा (हिं.) येथे सरकारी शेड उभारण्याचे काम सुरू असताना अचानक शेड कोसळून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी काकती पोलीस स्थानकात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. सुनील उर्फ शुभम मोहन सावंत (वय ३२, रा. पाटील गल्ली, शनिमंदिरजवळ) असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.

तो फॅब्रिकेशनचे काम करत होता. कामादरम्यान योग्य सुरक्षा उपाय न केल्याचा आरोप करत गणेशपूर येथील निर्मिती केंद्र तसेच चिक्कबागेवाडी येथील नागराज अमृत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद सुनीलचे वडील मोहन लक्ष्मण सावंत यांनी दिली आहे. सुळगा (हिं.) येथे शेड उभारणीचे काम सुरू असताना दि. २८ मार्च रोजी दुपारी शेड अचानक कोसळले आणि सुनील त्याखाली दबला गेला.

घटनेनंतर तात्काळ पत्रे व लोखंडी साहित्य हटवून त्याला बाहेर काढण्यात आले आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शनिवारी रात्री ११.४० वाजता त्याचा मृत्यू झाला.

कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. रविवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. सुनीलच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.