• साखर आयुक्त कार्यालयाला घातला घेराव
  • २७ साखर कारखान्यांकडे १५५४ कोटींची थकबाकी
  • कारखानदारांवर कारवाईची मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव, बागलकोट आणि विजयपूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हजारो कोटी रुपयांची थकबाकी साखर कारखान्यांकडे अडकून पडल्याने शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी बेळगाव येथील साखर आयुक्त कार्यालयावर घेराव घालून आंदोलन केले. थकित रक्कम तातडीने देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी सरकार आणि कारखानदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

रयत संघाचे प्रदेशाध्यक्ष चुन्नप्पा पुजेरी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी आयुक्त कार्यालयासमोर जमले होते. तीन जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडे उसाच्या बिलापोटी १ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकीत असल्याचा आरोप करत ती तातडीने देण्याची मागणी करण्यात आली. कारखानदारांनी प्रति टन उसाचा दर ३,३०० रुपये निश्चित केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पैसे देण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव जिल्ह्यातील २९ साखर कारखान्यांपैकी केवळ दोन कारखान्यांनी ऊस उत्पादकांची संपूर्ण देयके अदा केली आहेत. उर्वरित २७ कारखान्यांकडे तब्बल १५५४ कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

यावेळी बोलताना चुन्नप्पा पुजेरी यांनी कारखानदारांवर जाणीवपूर्वक पैसे अडवून ठेवत असल्याचा आरोप केला. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे मिळवून द्यावेत, अन्यथा संबंधित कारखानदारांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. ऊस पुरवठा केल्यानंतर १४ दिवसांच्या आत पैसे देणे बंधनकारक असतानाही अनेक कारखाने नियमांचे उल्लंघन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपस्थित असलेल्या एका शेतकरी कार्यकर्त्याने प्रशासनाला सवाल करत सांगितले की, ऊस लागवडीसाठी घेतलेल्या कर्जामुळे बँकांकडून शेतकऱ्यांना नोटिसा पाठविल्या जात आहेत. तीन महिन्यांपूर्वी कारखान्यांना ऊस पुरवठा करूनही पैसे मिळाले नसल्याने व्याजाचा बोजा वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कर्जफेड कशी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी आपली मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.