• सरकारकडे अनुदानासाठी ३४१ कोटींच्या तरतुदीची मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

राज्यातील विनाअनुदानित शाळा-कॉलेजमधील शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून नियमित वेतनाविना काम करत असल्याचा आरोप करत कर्नाटक विनाअनुदानित शाळा-कॉलेज कर्मचारी संघटना आणि विविध संघटनांच्या वतीने बेळगावात भव्य मोर्चा काढण्यात आला. पुरवणी अर्थसंकल्पात या शिक्षकांच्या हितासाठी ३४१ कोटी रुपयांची तरतूद करून १९९५ पासून सुरू असलेल्या कन्नड माध्यमाच्या विनाअनुदानित शिक्षण संस्थांना तातडीने अनुदान द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गुरुवारी सकाळी शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील विविध विनाअनुदानित शाळा व महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षिका आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने शहराचे लक्ष वेधून घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चाची सांगता झाली असून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

यावेळी बोलताना बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक राजू कुमार खिचडे यांनी सांगितले की, गेली वीस-पंचवीस वर्षे विनाअनुदानित शिक्षण संस्थांना अनुदान मिळावे आणि शिक्षकांना नियमित वेतन मिळावे यासाठी सातत्याने आंदोलन केले जात आहे. अनेक वर्षे ज्ञानदान करत असतानाही शिक्षकांना योग्य मोबदला मिळत नसल्याने त्यांची परिस्थिती ‘बिनपगारी फुल्ल अधिकारी’ अशी झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्य सरकारने विविध योजनांसाठी निधी जाहीर केला असताना शिक्षकांच्या मागण्यांकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडे उपलब्ध असलेल्या निधीतून किमान ३४१ कोटी रुपये विनाअनुदानित शिक्षण संस्थांसाठी मंजूर करावेत, अशी मागणी त्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास शिक्षक, त्यांची कुटुंबे, विद्यार्थी आणि पालकांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.