- जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा आणि तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी एकाच वेळी पंधराहून अधिक मोठ्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येणार असून, यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बेळगावात निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील जिल्हा क्रीडांगणावर ध्वजारोहण केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकास प्रकल्प जाहीर होऊनही प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब का होतो, या माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, एखादा प्रकल्प अर्थसंकल्पात जाहीर झाला की त्यासाठी पुढील अर्थसंकल्पात निधी उपलब्ध होतो. सध्याची आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्था अशी असून, त्यानुसारच कामकाज करावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी ७५ कोटी रुपये, माहिती व जनसंपर्क विभागाच्या पत्रिका भवनासाठी १० कोटी रुपये, सौंदत्ती यल्लम्मा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी २१५ कोटी रुपये, हुदली रेल्वे उड्डाणपुलासाठी ३५ कोटी रुपये तसेच गोकाक येथील लोळसूर पुलासाठी ४० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांची कामे मार्च महिन्यापर्यंत प्रत्यक्ष सुरू होतील, असे त्यांनी सांगितले.
मंत्री जारकीहोळी पुढे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात एकही नवीन पूल बांधलेला नाही. त्यामुळे गरज लक्षात घेऊन खानापूर तालुक्यात तीन, कागवाड तालुक्यात एक आणि निप्पाणी तालुक्यात दोन मोठ्या पुलांच्या बांधकामाची योजना आखण्यात आली आहे. आपण पदभार स्वीकारला तेव्हा राज्य व राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित तब्बल ४८ कामे विविध कारणांमुळे रखडलेली होती. त्यापैकी ३९ रस्ते विकास प्रकल्पांमधील अडचणी दूर करण्यात आल्या असून, उर्वरित तीन प्रकरणे सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा करून बेळगाव जिल्ह्यासाठी अधिक प्रकल्प व निधी मंजूर करण्याची विनंती करण्यात आली आहे. यावर केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
यावेळी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.








