बेळगाव / प्रतिनिधी

नववर्षाच्या उत्सवाच्या काळात हिंडलगा कारागृहाच्या परिसरात अज्ञात व्यक्तींनी ड्रग्ज तसेच मोबाईल फोन फेकल्याची घटना समोर आली असून, हा प्रकार कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंद झाला आहे. पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास तोंडाला मास्क लावलेल्या काही जणांनी कारागृहाच्या आवारात संशयास्पद वस्तू फेकून पळ काढल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेमुळे कारागृहातील कैद्यांपर्यंत ड्रग्ज व मोबाईल फोन पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रकरणाची दखल घेत पोलिस आयुक्त भूषण भोरसे यांनी हिंडलगा कारागृहाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कारागृह प्रशासन व कर्मचाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

पहाटेच्या सुमारास कारागृह परिसरात आलेल्या एका अज्ञात गुन्हेगाराने ड्रग्ज व मोबाईल फोन फेकून घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये नोंद झाल्याने तपासाला गती मिळाली आहे. कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.