- सुवर्णसौध परिसरात ठिय्या आंदोलन ; आमरण उपोषणाचा इशारा
बेळगाव / प्रतिनिधी
उत्तर कर्नाटकावर सातत्याने अन्याय व भेदभाव केला जात असून या भागाला सावत्र वागणूक दिली जात आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे उत्तर कर्नाटकाचा अपेक्षित विकास होत नाही. गेल्या सुमारे १५ वर्षांपासून विविध सरकारांकडे मागण्या मांडूनही केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. त्यामुळे उत्तर कर्नाटकाचा विकास करा, अन्यथा वेगळे राज्य द्या, असा कडक इशारा उत्तर कर्नाटकातील विविध संघटनांनी दिला आहे.
मंगळवारी (दि. १६) बेळगाव येथील बी. एस. येडियुराप्पा रोडवरील सुवर्णसौध परिसरात या संघटनांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. बेळगावला कर्नाटकाची दुसरी राजधानी घोषित करावी, बंगळूरहून किमान दहा महत्त्वाची राज्यस्तरीय कार्यालये सुवर्णसौध, बेळगाव येथे स्थलांतरित करावीत आणि कित्तूर येथे कर्नाटक विकास प्राधिकरण (केडीए) स्थापन करावे.
यासोबतच सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून ठोस विकास आराखडा तयार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. अधिवेशनात या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास स्वतंत्र उत्तर कर्नाटकची मागणी लावून धरली जाईल, तसेच १२ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले जाईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
हे आंदोलन अशोक पुजारी, अॅड. बी. डी. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून सुभाष शिरबूर, आप्पासाहेब बुगडे, नागेश गोलशेट्टी, उदय करंगीमठ, वीलनकुमार तारीहाळ यांच्यासह उत्तर कर्नाटकातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.








