बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला अडथळा आणण्याचे प्रयत्न केले तरीही, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने ठाम भूमिका घेत आज महामेळावा यशस्वीपणे पार पाडला. पहाटेपासूनच मराठी नेते आणि पदाधिकाऱ्यांना अटकसत्र सुरू झाले होते. व्हॅक्सिन डेपो मैदानावर मेळावा होऊ नये यासाठी पोलिसांनी रस्ते रोखून अडथळे निर्माण केले.

काल जिल्हा प्रशासनाने मध्यवर्ती म. ए. समितीला मेळावा घेण्यास परवानगी देऊन व्हॅक्सीन डेपो मैदान हे स्थळ निश्चित केले होते. परंतु, आज सोमवारी (ता. ८) पोलिसांनी महामेळाव्याला जाण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांना अटक करून विविध ठिकाणी स्थानबध्द केले. बेळगाव येथील एपीएमसी मार्केटच्या सभागृहात अनेकांना स्थानबध्द करण्यात आले होते. तरीही, मराठी बांधवांनी हिंमत न हरता बेळगाव एपीएमसी मार्केटमधील सभागृहातच एकत्र येऊन मेळावा घेत कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला. या महामेळाव्याचे अध्यक्षस्थान निडगल येथील ज्येष्ठ सीमा सत्याग्रही शंकरराव पाटील यांनी भूषवले. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या गर्जनांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

मेळाव्यात रणजित पाटील, ॲड. अमर यळ्ळूरकर, विलास बेळगांवकर, अंकुश केसरकर, रेणू किल्लेकर, प्रकाश शिरोळकर, प्रकाश अष्टेकर, सतीश पाटील, शुभम शेळके, विनायक पाटील, आर.एम.चौगुले, रामचंद्र मोदगेकर, नेताजी जाधव, मालोजीराव अष्टेकर आणि मनोहर किणेकर यांसह अनेक मराठी नेत्यांनी भाषण करून संताप व्यक्त केला.

  • मेळाव्यात मंजूर करण्यात आलेले तीन ठराव :

भाषावार प्रांत रचनेत झालेल्या अन्यायाची दखल घेऊन भौगोलिक सलगता, भाषिक बहुसंख्यता आणि लोकशाही तत्वांनुसार मराठी बहुल क्षेत्र महाराष्ट्रात समाविष्ट करावेत. मराठी भाषिकांचे अल्पसंख्याक हक्क सुनिश्चित करावेत मराठी कार्यकर्त्यांवरील खटले तात्काळ मागे घ्यावेत हे ठराव मालोजीराव अष्टेकर यांनी वाचून दाखवले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व ठराव मंजूर केले.