• १० ते १५ शेतकऱ्यांना बसला फटका

बेळगाव / प्रतिनिधी

अज्ञातांनी शेतातील कूपनलिकेची केबल तोडून नुकसान केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. येळ्ळूर शिवारात सदर घटना घडली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे यावर्षी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आता अज्ञातांकडून शेती तसेच अवजारांचे होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे.

काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी येळ्ळूर शिवारात एका शेतकयाच्या कूपनलिकेची वीजवाहिनी तोडून त्यामध्ये दगड टाकण्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता मंगळवारी रात्री पुन्हा दूर शिवारात कूपनलिकेची केबल तोडून लांबविल्याचा प्रकार घडला आहे. येळ्ळूर येथील श्रीधर कानशिडे, महादेव कुगजी, डोण्याण्णवर व गोरल यांच्यासह १० ते १२ शेतकऱ्यांच्या कूपनलिकांची केबल लांबविण्यात आली आहे.

  • पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे :

सध्या शिवारांमध्ये मद्यपींची संख्या वाढली आहे. वीज वाहिन्यांमधील तांब्याची तार विक्री करण्यासाठी असे चोरीचे प्रकार घडत आहेत. येळ्ळूर, वडगाव, अनगोळ शिवारामध्ये अशा चोरीच्या घटना वारंवार घडत असून पोलीस प्रशासनाने अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे