• स्मार्ट टीव्ही व तिजोरीचे उद्घाटन

येळ्ळूर : येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेत नूतन एसडीएमसी अध्यक्षा म्हणून सौ. दिव्या कुंडेकर यांची निवड करण्यात आली. याआधी २०२३-२६ या कालावधीत सौ. रूपा धामणेकर अध्यक्ष आणि सौ. गायत्री बिर्जे सदस्या म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा कार्यकाल संपल्याने नवीन निवड प्रक्रिया घेण्यात आली. या प्रक्रियेत सौ. ज्योती जोतिबा पाटील आणि सौ. अर्चना देसाई यांची नवी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

निवड प्रक्रिया ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी मासेकर आणि ग्रामविकास अधिकारी सौ. पुनम गडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यक्रमात माजी अध्यक्षा सौ. रूपा धामणेकर आणि सौ. गायत्री बिर्जे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नूतन सदस्यांचे स्वागतही करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आलेल्या स्मार्ट टीव्ही आणि यूपीएसचे उद्घाटन ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी मासेकर आणि पीडीओ सौ. पुनम गडगे यांच्या हस्ते झाले. तसेच युनियन बँक, येळ्ळूर शाखेतर्फे शाळेला दोन नवीन तिजोरी देण्यात आल्या. त्यांचे उद्घाटन शाखा व्यवस्थापक श्री अभिजीत सायमोते यांच्याहस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात सिद्धार्थ पाटील यांनी इयत्ता सातवीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी रोख बक्षिसांची घोषणा केली. प्रथम क्रमांकासाठी रू. १००१/-, द्वितीय क्रमांकासाठी रू. ७००/- आणि तृतीय क्रमांकासाठी रू. ५००/- अशी रक्कम देण्याचे जाहीर करण्यात आले.

या संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एसडीएमसी उपाध्यक्ष श्री. जोतिबा उडकेकर यांनी भूषवले. कार्यक्रमास एसडीएमसी सदस्य, युनियन बँकेचे कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्रकुमार चलवादी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एम. एस. मंडोळकर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. आर. एम. चलवादी यांनी केले, स्वागत व सत्कार श्री. एस. बी. पाखरे यांनी केले आणि आभारप्रदर्शन श्रीमती ए. वाय. मेणसे यांनी केले. कार्यक्रम शाळेच्या सभागृहात यशस्वीरीत्या पार पडला.