• ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे परिवहन प्रशासनाला निवेदन

येळ्ळूर : हणमंतगौंड नगर, येळ्ळूर येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी परिसरात नवीन बस थांबा उभारण्यात यावा, या मागणीसाठी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना आणि स्थानिक प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विभागीय नियंत्रक अधिकारी के. एल. गुड्डण्णावर आणि केएसआरटीसी अधिकारी विजयालक्ष्मी पुजारी यांना हे निवेदन देण्यात आले.

सध्या हणमंतगौंड नगर परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करत असून, त्यामध्ये शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मात्र, या भागात अधिकृत बस थांबा नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना दूरवर चालत जावे लागते, त्यामुळे अनेकदा त्यांची शाळा किंवा महाविद्यालयाची बस चुकते. तसेच रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहावी लागत असल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे. योग्य बस थांबा नसल्यामुळे चालकांनाही बस नेमकी कुठे थांबवायची याबाबत संभ्रम निर्माण होतो, परिणामी प्रवाशांना ताटकळत राहावे लागते.

ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे की, हणमंतगौंड नगर परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून बस थांब्याअभावी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर बस थांबा सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

दरम्यान, प्रशासनाने निवेदन स्वीकारून या मागणीबाबत सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, दिलीप पाटील, शिक्षिका रेणुका ताशीलदार, चंद्रकांत पाटील, नारायण दळवी, अनिल पाटील, राजू पाटील, एकनाथ पाटील, महादेव कदम, प्रकाश पाटील, जगन्नाथ पाटील, प्रवीण पाटील, सुशांत पाटील, सुरेश पाखरे, निरंजन दळवी, ओमकार पाटील यांच्यासह हणमंतगौंड नगरमधील अनेक नागरिक, तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.