बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतीत सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचा निधी बेकायदेशीररित्या खर्च करण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांसह दलित संघटनांनी केला आहे. या प्रकरणात तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पालकमंत्री तसेच जिल्हा व तालुका पंचायत अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या संदर्भात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी निवेदन स्वीकारत, चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिले.

सदस्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एडीजीपींच्या आदेशानुसार जिल्हा पंचायत सीईओंनी पंचायत विकास अधिकारी (PDO) व अध्यक्षांविरुद्ध कारवाई करणे अपेक्षित होते, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे पुढील आठवड्यातही दुर्लक्ष झाल्यास लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यासह आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीमार्फत एकूण २७ विकासकामांवर नियमबाह्य पद्धतीने खर्च करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, यामुळे निधीच्या गैरवापराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

याप्रसंगी ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य शिवाजी नंदूरकर, रमेश मेणसे, पिंटू चौगुले, मनीषा घाडी, शालन पाटील, परशराम परीट, तसेच दलित संघटनेचे पदाधिकारी विलास घाडी, लक्ष्मण छत्र्याण्णवर, शशिकांत हुवाण्णवर, महेश हुवाण्णवर, मनोहर पाटील, परशराम घाडी आदी उपस्थित होते.