बेळगाव / प्रतिनिधी

रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या एकविसाव्या येळ्ळूर ग्रामीण साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ येळ्ळूर येथील वाडी शाळेच्या पटांगणावर उत्साहात रोवण्यात आली. गोविंद टक्केकर यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवून संमेलनाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे मदन बामणे यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख वक्ते अनंत लाड यांनी आपल्या भाषणात मराठी भाषा ही वारसा हक्काप्रमाणे संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपल्यापर्यंत चालत आलेली आहे, असे प्रतिपादन केले.

मदन बामणे यांनी मराठी भाषा ही संस्कृतीचे दर्पण असून तिच्यातून मानवतावादी विचारांची उजळणी होत असल्याचे सांगितले. श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जाधव यांनी केले. प्रास्ताविक जयंत मोटराचे यांनी मांडले, तर आभार राम पाखरे यांनी मानले. संमेलनाच्या तयारीला यामुळे अधिक वेग आला असून साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.