बेळगाव / प्रतिनिधी

गर्दीचा फायदा घेत मध्यवर्ती बसस्थानकावर दागिने चोरणाऱ्या तामिळनाडू येथील महिलेला शुक्रवारी मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. मोनिशा मणिगंडन (वय २८ रा. तामिळनाडू) असे तिचे नाव असून तिच्याकडून ५ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ५१ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत दागिने चोरल्याची तक्रार ज्योती रामगौडा पाटील, (रा. हनुमान मंदिरनजीक, भोजवाडी, ता. निपाणी) यांनी मार्केट पोलिसात दिली होती. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा तपास चालविला होता. वरील संशयित महिलेला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता तिने मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरल्याची कबुली दिली.

सदर कारवाई मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, पोलीस उपनिरीक्षक एच. एल. केरुर, त्यांचे सहकारी ए. बी. नवीनकुमार, एल. एस. कडोलकर, आसिर जमादार, सुरेश एम. कांबळे, कार्तिक जी. एम., एम. बी. वडेयार, मल्लिकार्जुन गुदीगोप्प, रमेश अक्की, महादेव काशिद यांनी या कारवाईत सहभाग घेतला.