- समाज सारथी सेवा संघाच्या बैठकीत गोविंद काळसेकर यांचे प्रतिपादन
येळ्ळूर , ता. १५ : वाढत्या व्यसनाधीनतेमुळे युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून त्याचा सर्वाधिक मानसिक व सामाजिक फटका पालकांना बसतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन युवकांनी आत्मचिंतन करून योग्य मार्ग निवडावा, असा सल्ला निवृत्त शिक्षक तथा संघटनेचे हिशोब तपासनीस गोविंद काळसेकर यांनी दिला. ते समाज सारथी सेवा संघाच्या बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. सी. एम. गोरल होते.
गावात दारू, गांजा, सिगारेट यांसारखे अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने युवकांसोबत अल्पवयीन मुलेही व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची खंत काळसेकर यांनी व्यक्त केली. या प्रवृत्तीमुळे कुटुंब आणि समाज दोन्हींचे नुकसान होत असून पुढील पिढी धोक्यात येत आहे. वेळीच ठोस उपाययोजना आणि प्रबोधन न केल्यास परिस्थिती गंभीर बनेल, असा इशारा त्यांनी दिला. व्यसनमुक्तीसाठी संघटनेने पुढाकार घेऊन युवकांना योग्य दिशादर्शन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- डॉल्बीमुक्तीसाठीही प्रयत्नांची गरज :
बैठकीत गावातील डॉल्बी संस्कृतीवरही चर्चा झाली. लग्नसोहळा हा पवित्र मंगल प्रसंग असला तरी आज त्याचे स्वरूप बदलत चालले आहे. शुभमुहूर्त, विधी आणि पाहुण्यांची सोय याकडे दुर्लक्ष करून केवळ डॉल्बी व बँडच्या गजरात नाचावर भर दिला जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. आनंद साजरा करताना वेळेचे व मर्यादांचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त झाले.
मुलांच्या परीक्षांचा काळ सुरू असताना मध्यरात्रीपर्यंत कर्णकर्कश आवाजात डॉल्बी वाजवणे, मोठ्या आवाजाचे फटाके फोडणे यामुळे नागरिक, आजारी व ज्येष्ठ व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो. ग्रामदेवता चांगळेश्वरी देवीच्या यात्रेतही प्रत्येक गल्लीमध्ये डॉल्बी लावल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. कान ठरावीक डेसिबलपर्यंतच आवाज सहन करू शकतो, याचे भान ठेवून डॉल्बीमुक्त गावासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन अनिल हुंदरे यांनी केले.
हणमंत पाटील, मनोहर गोरल, गंगाधर पाटील यांनीही या विषयावर मौलिक सूचना मांडत गावाने एकत्र येऊन आदर्श निर्माण करावा, असे सांगितले.
बैठकीस परशराम कणबरकर, शिवाजी सायनेकर, प्रकाश अष्टेकर, बळीराम देसुरकर, रमेश धामणेकर, प्रकाश पाटील, डॉ. तानाजी पावले, सुरज गोरल, परशराम बिजगरकर, संजय गोरल, संजय मजुकर, यल्लुप्पा पाटील, परशराम धामणेकर, राजू पावले, सतीश पाटील, कृष्णा टक्केकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक बी. एन. मजुकर यांनी केले, तर आभार डॉ. तानाजी पावले यांनी मानले.








