बेळगाव / प्रतिनिधी

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (दमासा) कोल्हापूर यांच्यावतीने २०२४ चे साहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. त्यामध्ये बेळगाव येथील साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांच्या “युगांत” कादंबरीला कै. महादेव मोरे पुरस्कार जाहीर झाला आहे. सीमाभागातील या ज्येष्ठ लेखकाच्या नावाचा पुरस्कार सीमा भागातीलच दुसऱ्या साहित्यिकाला मिळतो हा सुंदर योगायोग असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

डॉ. गायकवाड यांची युगांत कादंबरी पितामह भीष्मांच्या जीवनावर आधारित आहे. या कादंबरीचे हिंदी ,तमिळ, इंग्लिश आणि कन्नड मध्ये अनुवादही प्रकाशित झाले असून यापूर्वीही तिला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हिंदी अनुवादाचे आखर या यूट्यूब चॅनल वरून प्रा. डॉ. प्रतिभा मुदलियार आणि म्हैसूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी वाचन केले आहे.

आपली प्रतिक्रिया देताना डॉ. गायकवाड म्हणाले की, दमसाने सीमा भागातील साहित्यिकांची दखल घेतली ही आनंदाची बाब आहे. महादेव मोरे हे माझे आवडते लेखक आहेत या तपस्वी लेखकाच्या नावाचा पुरस्कार सन्मानाचा असून त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. या पुरस्काराबद्दल गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.