बेळगाव : वेणुग्राम पुरोहित संघाच्या वतीने पुरोहितांना ज्योतिषशास्त्रातील सखोल ज्ञानाची ओळख व्हावी तसेच ज्योतिषशास्त्राच्या एका वेगळ्या आणि पारंपरिक पद्धतीचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय कवडी ज्योतिषशास्त्र कार्यशाळेची बुधवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.
दि. १७ ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अणसुरकर गल्ली येथील छत्रे वाडा येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वेणुग्राम पुरोहित संघाचे अध्यक्ष श्री. दुर्गेश बोंद्रे गुरुजी आणि श्री. वासुदेव छत्रे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेत प्रसिद्ध वैदिक ज्योतिष अभ्यासक व कवडी ज्योतिषशास्त्रज्ञ श्री गणेशशास्त्री शुक्ल गुरुजी यांनी उपस्थित पुरोहित बांधवांना कवडी ज्योतिषशास्त्राचे सविस्तर मार्गदर्शन केले. कवडी ज्योतिषशास्त्राची पारंपरिक गुरुपरंपरा, त्यामागील ज्योतिषीय संकल्पना, नवग्रह, राशी, भाव तसेच विविध प्रश्नांचे ज्योतिषशास्त्रीय पद्धतीने आकलन करण्याचे तंत्र याविषयी त्यांनी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.

वैदिक परंपरेशी निगडित असलेल्या पुरोहितांना ज्योतिषशास्त्रातील या वेगळ्या ज्ञानशाखेची ओळख करून देणे, त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध करणे आणि पारंपरिक विद्येचे जतन व संवर्धन करणे हा या कार्यशाळेचा प्रमुख हेतू होता. वेणुग्राम पुरोहित संघातील अनेक पुरोहित बांधवांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
तीन दिवसांच्या या प्रशिक्षणामुळे सहभागी पुरोहितांना ज्योतिषशास्त्राच्या एका नवीन अभ्यासपद्धतीची ओळख झाली. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक काळातील ज्ञानप्राप्तीची आवश्यकता यांचा सुंदर समन्वय या कार्यशाळेत साधण्यात आला.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी वेणुग्राम पुरोहित संघाचे पदाधिकारी, अध्यक्ष श्री. दुर्गेश बोंद्रे गुरुजी, श्री. वासुदेव छत्रे गुरुजी तसेच सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे पुरोहित वर्गासाठी ज्ञानवृद्धीचा एक नवीन मार्ग खुला झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.








