- बंबरगे गावातील घटना
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील बंबरगे गावात पावसादरम्यान विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अमोल विवेकानंद उर्फ लालू जाधव (वय ४३ रा.रामनगर, कंग्राळी खुर्द) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, अमोल जाधव यांचे बंबरगे येथे कुक्कुटपालन केंद्र आहे. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसात पाण्याची मोटार सुरू करताना त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला. त्यावेळी त्यांची पत्नी जवळच होती. तिने तत्काळ शेजाऱ्यांना संपर्क करून मदत मागवली.
अमोल याला तातडीने बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती हेस्कॉम आणि पोलिस विभागाला देण्यात आली आहे.
शनिवारी, २५ ऑक्टोबर रोजी मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता अत्यसंस्कार होणार आहेत असे सांगण्यात आले.
अमोल जाधव मनमिळावू, शांत स्वभावाचा आणि सर्वांच्या आवडीचा होता. त्याच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.








