बेळगाव / प्रतिनिधी

वंटमुरी येथील सरकारी रुग्णालयामधील एका बाळंतीणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी घडली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली आहे. मृत्युमुखी पडलेल्या बाळंतिणीचे नांव निखिता मादर असे आहे. कन्येला जन्म दिल्यानंतर तिचे निधन झाले आहे. प्रसूती जवळ आल्यामुळे निखिता हिला गेल्या शुक्रवारी प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर नैसर्गिक प्रसुती शक्य नसल्यामुळे तिला सिझरीन शस्त्रक्रियेसाठी वंटमुरी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. त्या ठिकाणी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून निकिता हिने मुलीला जन्म दिला. मात्र त्यानंतर अल्पावधीत प्रकृती बिघडून तिचे निधन झाले. तिचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.

सदर घटनेची माळमारुती पोलीस स्थानकात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. सरकारी रुग्णालयांमधील कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यापूर्वी जिल्हा रुग्णालय असलेल्या बिम्स मध्ये देखील अशाच प्रकारे घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप उसळला  होता.