बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील भक्तांची जागृत देवी असलेल्या वडगावची ग्रामदेवता असलेली श्री मंगाई देवीचा यात्रोत्सव देखील समस्त वडगाव आणि बेळगाववासीयांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. उद्या मंगळवार दि. २२ रोजी होणाऱ्या या उत्सवाच्या पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे. वाढत्या महागाईचे सावट असले तरी परंपरेनुसार यात्रा साजरी करण्यास वडगाववासीयांची तयारी सुरू आहे. मागील वर्षापासून जिल्हा प्रशासनाने पशुबळीवर निर्बंध घातल्याने नियमांचे पालन करून यात्रोत्सव साजरा केला जात आहे. शेतकऱ्यांची यात्रा तथा नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मंगाई देवीच्या यात्रेनिमित्त वार पाळणूक झाली आहे. त्याआधी देवीला गा-हाणे घालण्यात आले. पाऊस चांगला होऊन भरघोस पीक येऊ दे, गावात रोगराई येऊ नये, सर्वांना सुख-शांती आणि चांगले आरोग्य लाभो आदी मागण्यांचे गा-हाणे घातले जाते. यात्रेदिवशी सकाळी देवीचे हक्कदार, पंचमंडळी व ग्रामस्थांच्यावतीने सवाद्य मिरवणुकीने परिसरातील विविध मंदिरांत जाऊन पूजा करण्यात येते. त्यानंतर पाटील गल्ली, वडगाव येथील मंगाई मंदिरात पूजा करून गा-हाणे उतरवण्यात येतात.
त्यानंतर भरयात्रेची सुरुवात होते. यात्रेनिमित्त पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते. दुपारनंतर भाविकांची अलोट गर्दी असते. विशेषतः महिलांची लक्षणीय गर्दी असते. ओटी भरण्यासह नवस फेडण्यासाठी चढाओढ सुरू असते. यात्रेदिवशी पाऊस हे यात्रेचे वैशिष्ट्य असून, भरपावसातही यात्रेचा उत्साह टिकून असतो. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल होते. यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार असला तरी किमान आठवडाभर उत्सवात गर्दी असते. दर मंगळवार आणि शुक्रवारीही भाविकांची दर्शनासाठी रिघ लागलेली असते. जागृत व नवसाला पावणारी देवी म्हणून मंगाई देवीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. सर्व जाती आणि भाषिक लोक या मंदिरात येत असतात.
यंदा वाढत्या महागाईचे सावट काही प्रमाणात यात्रेवर दिसून येत आहे. मात्र, ग्रामदेवीची पारंपरिक पद्धतीने यात्रा साजरी करण्यात येत आहे.