• खड्डे आणि पाण्यामुळे वाहनचालक त्रस्त

बेळगाव : वडगाव – खासबाग रोडची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, पावसामुळे रस्त्यावर चिखल, पाणी आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्याची अवस्था अधिक धोकादायक ठरत असून, अपघाताची भीती व्यक्त होत आहे.

रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी कडेला टाकण्यात आलेली लाल माती आणि दगड पावसाच्या पाण्यासोबत रस्त्यावर पसरले आहेत. त्यामुळे संपूर्ण रस्ता निसरडा झाला असून, दुचाकीस्वारांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. चिखलामुळे दुचाकी घसरण्याचा धोका वाढला आहे.

रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने खड्डे दिसून येत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना अंदाज घेत वाहन चालवावे लागत आहे. चिखल आणि पाण्यामुळे लहान चारचाकी वाहनांनाही या मार्गावरून जाताना अडचणी येत आहेत.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, महापालिका प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. रस्त्यावर साचलेली माती व चिखल हटवून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी, तसेच दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.