बेळगाव : उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते बेंगळूरमधील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस या मार्गावर दोन साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत या गाड्या एकूण १३ फेऱ्या पार करतील, ज्यामुळे बेळगावसह मार्गावरील प्रवाशांना मोठी सोय होणार आहे.

साप्ताहिक विशेष एक्सप्रेस (क्र. ०१०१३) १९ एप्रिल ते १२ जुलै २०२६ या कालावधीत दर रविवारी ११.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि सोमवारी ११.४५ वाजता सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनसवर पोहचेल. परतीच्या प्रवासासाठी (क्र. ०१०१४) २० एप्रिल ते १३ जुलै दर सोमवारी १३.५० वाजता बंगळूरमधून सुटेल आणि मंगळवारी १३.३० वाजता मुंबईला पोचेल.

या विशेष रेल्वेत प्रवास करताना गाडी ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, रायबाग, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड, हुबळी, हावेरी, हरिहर, दावणगेरी, चिकजाजूर, बिरुर, अर्सिकेरे आणि तुमकूर या प्रमुख स्थानकांवर थांबेल.

गाडीत एकूण २२ बोगी असतील, ज्यात वातानुकूलित, स्लीपर आणि सामान्य बोगींचा समावेश असेल, त्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाची हमी मिळणार आहे.