- ग्रंथदिंडी, साहित्यिकांच्या मांदियाळीत उद्या रंगणार संमेलन
उचगाव / वार्ताहर
विठ्ठल भक्तीच्या ओढीने वारकरी दरवर्षीच्या उत्कट भावनेने पंढरीची वारी करतात त्याच भावनेने उचगाव येथे उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 25 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी रसिक, वारकरी ,आवर्जून येतात त्यांच्या स्वागतासाठी उचगाव नगरी सज्ज झाली असून साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. गावात उत्साहाचे वातावरण असून उचगावच्या मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई च्या प्रांगणातील गांधी चौकामध्ये संमेलन स्थळी भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. ग्रंथ दिंडी मार्गावर आणि ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आले आहेत .सीमा भागातील मराठी भाषेचे संवर्धन करणे ,साहित्यिक निर्माण करणे तसेच मराठी साहित्याचा प्रसार व्हावा या हेतूने उचगाव परिसरातील मराठी भाषिक गेली 24 वर्षे संमेलनाच्या माध्यमातून कार्यरत आहेत .संमेलनासाठी महाराष्ट्रातून दिग्गज साहित्यिक आणि बेळगाव, निपाणी ,चंदगड, खानापूर तालुक्यातील साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत .संमेलनासाठी लोकमान्य मल्टी परपज सोसायटीचे संस्थापक ,चेअरमन आणि तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकूर यांची या संमेलनाला खास उपस्थिती राहणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर उपस्थित राहणार आहेत. सकाळी ठीक साडेनऊ वाजता गांधी चौकातून ग्रंथ दिंडीचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये वारकरी, सांप्रदायाचे भजनी मंडळ ,महिला भजनी मंडळ ,ढोल, ताशा ,झांजपथक, लेझीम तसेच परिसरातील शाळांचे विद्यार्थी ,विद्यार्थिनी उचगाव पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक संघटनेचे सैनिक वेशभूषेमध्ये सामील होणार आहेत. ही ग्रंथदिंडी गणपत गल्ली मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कचेरी गल्लीतून संमेलन स्थळी येणार आहे.
यानंतर गणेश पूजन उचगाव ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष बाळकृष्ण खाचो तेरसे यांच्याहस्ते होणार आहे. विठ्ठल रखुमाई पूजन मराठा बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर आणि अशोक कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. श्रीराम पूजन वेंकटेश शहापूरकर यांच्या हस्ते तर मळेकरणी देवीचे पूजन बाळकृष्ण नेसरकर यांच्या हस्ते होणार आहे. पालखी पूजन डॉ. सोनाली सरनोबत, ग्रंथ दिंडी पूजन बसवंत मायानाचे, ग्रंथ दिंडी उद्घाटन धनंजय जाधव, ग्रंथ दिंडी मिरवणूक शुभारंभ संजय सुंठकर, पुस्तक प्रदर्शन उद्घाटन शेखर हांडे, सभामंडपाचे उद्घाटन जयवंत बाळेकुंद्री, व्यासपीठाचे उद्घाटन राजू जाधव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन बाळाराम पाटील ,सरस्वती फोटो पूजन प्रेमानंद गुरव, ज्ञानेश्वर फोटो पूजन दिनकरराव पावशे या मान्यवरांच्या हस्ते हा पूजनचा कार्यक्रम पार पडणार आहे.
याबरोबरच चार सत्रातील साहित्यिकांचे विचार साहित्यिक मांडणार आहेत. तरी या संमेलनाला सर्व साहित्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर,सेक्रेटरी एन.ओ.चौगले , कार्याध्यक्ष बाळासाहेब देसाई यांनी केले आहे.








