• सात लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त
  • काकती पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

काकती पोलिसांनी जलदगतीने तपास करत एका दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून सुमारे ७ लाख रुपये किमतीच्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत. मुजीफ मंजूर अहमद शेख (वय २१, रा. विष्णू गल्ली, वडगाव – बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काकती येथील अब्दुलरशीद इमासाब डोणकर यांनी २१ डिसेंबर २०२५ रोजी आपली सुझुकी एक्नस दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार काकती पोलीस स्थानकात दिली होती. या तक्रारीच्या आधारे काकती पोलीस निरीक्षक गंगाधर बी. एम. यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने कार्यवाही सुरू केली.

तपासादरम्यान संशयाच्या आधारे मुजीफ शेख याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून तक्रारदाराची चोरी गेलेली दुचाकी तसेच इतर ९ चोरीची वाहने जप्त केली.

तपासात उघड झाले की, आरोपीने काकती पोलीस स्थानकाच्या हद्दीतून ३, हिरेबागेवाडी हद्दीतून ३, माळमारुती हद्दीतून २, मारीहाळ हद्दीतून १ आणि अन्य एका ठिकाणाहून १ अशी एकूण १० दुचाकी वाहने चोरली होती. जप्त वाहनांमध्ये ६ हिरो होंडा स्प्लेंडर आणि ४ सुझुकी एक्नस दुचाकींचा समावेश आहे.

या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी पोलीस निरीक्षक गंगाधर बी. एम. आणि त्यांच्या तपास पथकाचे कौतुक करत शाबासकी दिली आहे.