- साडेनऊ लाखांचे दागिने जप्त : मार्केट पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची बॅग व दागिने पळविणाऱ्या दोघा आंतरराज्य गुन्हेगारांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून ९ लाख ३१ हजार रुपये किमतीचे ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. प्रकाश विजय जाधव (वय ४६) राहणार औरंगाबाद, ता. शिरूर कासर, जि. बीड, काळीदास दिलीप बरडे (वय २७) राहणार मिडसांगवी, ता. वाथारडी, जि. अहमदनगर अशी त्यांची नावे आहेत.
बैलहोंगल तालुक्यातील मत्तीकोप्प येथील पुंडलिक भीमाप्पा लेंकन्नावर हे बसमधून उतरताना त्यांचे सोन्याचे दागिने पळविण्यात आले होते शुक्रवार दि. १८ जुलै रोजी यासंबंधी त्यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी प्रकाश व काळीदास या दोघा जणांना अटक केली आहे. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक एच. एल. केरुर, एस. जी. कुगटोळी, सुरेश कांबळे, एल. एस. कडोलकर, आशिर जमादार, कार्तिक जी. एम., एम. बी. वडेयर, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की व महादेव काशिद आदींचा समावेश असलेल्या पथकाने या जोडगोळीला अटक करून दागिने जप्त केले आहेत.
चालूवर्षी दोन व गेल्यावर्षी एक असे एकूण तीन गुन्हे केल्याची कबुली या जोडगोळीने दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवरून ९ लाख ३१ हजार रुपये किमतीचे ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांनी या कारवाईत भाग घेतलेल्या अधिकारी व पोलिसांचे कौतुक केले आहे.