• ग्रामस्थांचा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानावर मोर्चा
  • कचरा डेपो अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमधील तुरमुरी कचरा डेपो रद्द करण्यासाठी हिंडलगा, आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, बाची, बसुर्ते, उचगाव आणि कोनेवाडी येथील ग्रामस्थांनी आज मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगावमधील तुरमुरी कचरा डेपो विरोधात आवाज उठवला आहे. “शहरातील कचरा ग्रामीण भागात नको आहे,” असे म्हणत एक नागरिक म्हणून आपणही आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या समस्येला जबाबदार असलेल्या खासदार, आमदार आणि महापौरांच्या घरासमोर गावकऱ्यांनी आपला कचरा घेऊन आंदोलन करावे, असे आवाहन करून त्यांनी या संघर्षाला नवीन स्वरूप दिले.

बेळगाव तालुक्याच्या तुरमुरी गावातील कचरा डेपो रद्द करण्याच्या मागणीसाठी श्री कलमेश्वर मंदिरापासून महिला व बालविकास मंत्री आणि बेळगाव ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

गावकऱ्यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना सांगितले की, २००६ पासून गावकरी तुरमुरी येथील कचरा डेपोला करत आहेत. यामुळे आजूबाजूच्या गावांना त्रास होत आहे. लोकांना इतका त्रास होत आहे की ते नीट जेवणही करू शकत नाहीत. रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे सदर कचरा डेपो तात्काळ रद्द करावा अशी विनंती गावकऱ्यांनी केली.

काडाचे अध्यक्ष युवराज कदम यांनी मंत्र्यांची समजूत घातली. कचरा डेपोमुळे आधीच विविध समस्या निर्माण झाल्या असून येत्या काही दिवसांत पाईपलाईन देखील दूषित होतील, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

यानंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तात्काळ नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांना व्हिडिओ कॉल करून जमलेल्या नागरिकांच्या गर्दीकडे लक्ष वेधले आणि हा मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणून दिला. नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांनी चौकशी करून मंत्रिमंडळात चर्चा करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, ही केवळ माझीच जबाबदारी नाही, तर महापौर, शहरातील आमदार आणि महापालिकेच्या खासदारांचीही जबाबदारी आहे. शहरातील कचरा ग्रामीण भागात का जातो? शहरातील कचरा ग्रामीण भागात जाता कामा नये. महापौर, शहर आमदार आसिफ सेठ, दक्षिण आमदार अभय पाटील आणि खासदार जगदीश शेट्टर यांच्या निवासस्थानासमोर कचरा घेऊन आंदोलन करावे. ग्रामीण भागातील जनतेची कन्या म्हणून मी सुद्धा या आंदोलनात सहभागी होईन. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी आणि लोकांच्या समस्या सोडवाव्यात, असे त्या म्हणाल्या.

मंत्री पुढे म्हणाल्या, “ग्रामीण भागात कचरा टाकणाऱ्यांनी जनतेला काय दिले आहे? ९ एप्रिलपर्यंत गावकऱ्यांनी दोन्ही आमदार, खासदार, महापौर आणि उपमहापौर यांच्या घरासमोर कचरा घेऊन कचरा डेपो विरोधात आंदोलन करावे आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून द्यावी. त्यानंतर, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयात एक मोठी सभा होईल. गावपातळीवरील कचऱ्याची विल्हेवाट तिथेच लावली पाहिजे, तो तुरमुरीला पाठवू नये,” असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.

यावेळी चंद्रकांत जाधव, पुंडलिक खांडेकर, नागराज जाधव, सोमनाथ बेळगावकर, पुंडलिक बेळगावकर, सुनील बेळगावकर, सिद्धाप्पा कांबळे, अनिल खनगावकर, आनंद बंगे, शिवाजीराव खांडेकर, नारायण शहापूरकर यांच्यासह हिंडलगा, आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, बाची, बसुर्ते, उचगाव, कोनेवाडी येथील हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते.