बेळगाव / प्रतिनिधी
सुवर्ण विधानसौध येथे आज हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेत दिवंगत दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह अन्य मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे देशाने एक महान कलाकार आणि लोकप्रिय नेता गमावल्याचे सभागृहात स्पष्ट करण्यात आले.
धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, निर्माते तसेच माजी खासदार होते. त्यांनी १९६० मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. शोले, धर्म वीर, चुपके चुपके यांसारखे अनेक चित्रपट आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. ‘शोले’ या चित्रपटाला सर्वकालीन सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानले जाते.
कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषणसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. चित्रपट क्षेत्राबरोबरच त्यांनी २००४ ते २००९ दरम्यान बिकानेर मतदारसंघाचे लोकसभा सदस्य म्हणून काम पाहिले.
धर्मेंद्र यांच्यासह माजी विधानपरिषद सदस्य के. नरहरी, माजी सदस्य आर. व्ही. देवराज, हुल्लाप्पा मेती, साहित्यिक डॉ. एन. आर. नायक, कादंबरीकार एस. एल. भैरप्पा, पत्रकार टी. जे. एस. जॉर्ज, सुगम संगीत गायिका अनुराधा धारेश्वर, पर्यावरण रक्षक पद्मश्री सालुमारदा थिम्मक्का आणि विनोदी कलाकार श्रीकंठैया उमेश यांच्याही स्मरणाला सभागृहात मान देण्यात आला.
सभागृहाचे नेते बोसराजू आणि विरोधी पक्षनेते यांनी दिवंगतांच्या कार्याची आठवण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी सभागृहात एक मिनिट मौन पाळण्यात आले.







