बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनला कृषी पणन विभागाने मोठा धक्का दिला आहे. परवान्याच्या अटींचे उल्लंघन झाल्याने तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यात संस्थेला अपयश आल्याने एपीएमसीच्या निर्देशकांनी या खासगी भाजी बाजारपेठेचे ट्रेडिंग लायसन्स रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

याआधी भूखंडाच्या वापराबाबतचा आदेश रद्द झाल्यामुळे या खासगी मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर व्यापाऱ्यांनी बेळगाव महानगरपालिकेकडे घाईगडबडीत निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र आता एपीएमसीच्या नव्या निर्णयामुळे पुन्हा व्यापाऱ्यांत गोंधळाचे वातावरण आहे.

जय किसान असोसिएशनला खासगी बाजार उभारणी व त्याचे संचालन करण्यासाठी देण्यात आलेल्या लायसन्सच्या अटींचे पालन होत नाही, अशा तक्रारी शेतकरी संघटनांनी सातत्याने केल्या होत्या. त्यानुसार कृषी पणन विभागाने अखेर ही कठोर कारवाई केली.