बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे फाटकावर उभारलेल्या उड्डाणपुलाची दुरवस्था झाली असून, दुसऱ्या बाजूचे काम अद्याप अपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विन वैष्णव यांना पत्र पाठवून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे.

शहराच्या दक्षिण भागाची वाहतूक सुलभ करण्यासाठी या उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात आले होते. पुलाचा एक भाग ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्यात आला; परंतु काहीच दिवसांत रस्त्याची झपाट्याने दुरावस्था झाली. त्यावेळी नैऋत्य रेल्वेने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईही केली होती.

सध्या पुलावरील रस्ता खड्ड्यांनी भरून गेला असून वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहने चालवताना अपघाताचा धोका वाढला आहे. त्यातच, पुलाच्या दुसऱ्या टोकाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असल्याने वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय कायम आहे.

या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे युवा समितीने थेट रेल्वेमंत्र्यांना निवेदन देत या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यासोबतच अपूर्ण भागाचे काम त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी केली आहे. सोशल मीडियावर व स्थानिक जनप्रतिनिधींनीही या विषयावर आवाज उठवला असला, तरी प्रत्यक्ष कृती झालेली नाही, असा आरोप समितीने केला आहे.