• ८.३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त
  • टिळकवाडी पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा करण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ८.३० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह इतर वस्तू जप्त केल्या आहेत.

टिळकवाडी स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या सावरकर रोडवरील एका घरात आणि हिंदवाडी येथील अमित डिलक्स लॉजिंग मधील चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करून शहर पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्यासह उपायुक्त रोहन जगदीश, उपायुक्त एन. निरंजनराज अरस, खडेबाजारचे एसीपी एच.शेखरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक परशुराम पुजेरी यांच्या नेतृत्वाखाली टिळकवाडी पोलिस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या दोन्ही चोरींचा छडा लावण्यात यश मिळवले.

या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ५,७०,००० रुपये किमतीच्या ५८.८६० ग्रॅम सोन्याच्या बांगड्या, सुमारे २,५०,००० रुपये किमतीची केए – २२ एचयू – २४३२ क्रमांकाची राखाडी रंगाची एक दुचाकी आणि १०,००० रुपये किमतीचा काळ्या रंगाचा एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपास पथकात टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी, पीएसआय विश्वनाथ घंबामट, पीएसआय प्रभाकर डोल्ली यांच्यासह कर्मचारी महेश पाटील, एस. एम. करलिंगण्णावर, नागेंद्र तलवार, लाडजीसाब मुल्तानी, सतीश गिरी आणि अरुण पाटील यांचा समावेश होता. या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे शहर पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे कौतुक यांनी कौतुक करून बक्षिसे जाहीर केली आहेत.