- मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द
बेळगाव / प्रतिनिधी
अमन नगर परिसरात धुरामुळे गुदमरून मृत्युमुखी पडलेल्या तीन तरुणांचे शवविच्छेदन बुधवारी सकाळी बिम्स रुग्णालयातील शवागारात करण्यात आले. अहवालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिन्ही तरुणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.
या दुर्घटनेत रेहान माठे (वय २२), सरफराज हरपन्नहळ्ळी (वय २२) आणि मोईन नलबंद (वय २२) या तिघांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, घरात रात्रीच्या वेळी उब मिळावी म्हणून शेकोटीचा वापर करण्यात आला होता. मात्र, राहत्या खोलीत खिडक्या नसल्याने धूर बाहेर पडण्यास जागा नव्हती. त्यामुळे धुराचा साठा झाला आणि झोपेतच तिघांचा श्वास गुदमरल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेत शाहनवाज हरपन्नहळ्ळी याच्याही प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला असून सध्या त्याच्यावर बेळगावातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची स्थिती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
घटनेनंतर माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत असून, यासंदर्भात पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.








