- ७ हजारांची रोकड लंपास : घटना सीसीटीव्हीत कैद
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात चोरट्यांची सक्रीय टोळी उच्छाद मांडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एपीएमसी मार्केट यार्डातील कृष्णा कृषी केंद्रात मध्यरात्री चोरी करून जवळपास ७ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, तीन चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील रोकड लंपास केल्यानंतर एकामागून एक दुकानाबाहेर निघून जाताना त्यांच्या हालचाली स्पष्टपणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत.
आज सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या कृष्णा कृषी केंद्राच्या मालकांनी चोरी लक्षात येताच एपीएमसी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
शहरात सलगपणे वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारीवर्गात प्रचंड असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. एपीएमसी पोलिस स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.








