- दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती
नवी दिल्ली : गेल्या आठ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे. पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारताच्या एमआय यांच्याशी आज दुपारी ३.३५ वाजता फोनवरून चर्चा केली. दोघांमध्ये दोन्ही बाजूंकडील गोळीबार, जमिनीवरील लष्करी कारवाई तसेच हवाई आणि समुद्री कारवाई भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून थांबवण्याबाबत एकवाक्यता झाली. याबाबतच्या सूचना दोन्ही बाजूंना देण्यात आल्या आहेत. १२ मे रोजी दुपारी १२ वाजता दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करतील, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
या पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज दुपारी 3:35 वाजता भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार ५ वा. पासून दोन्ही बाजूंकडून जमिनीवर, हवेत आणि समुद्र असा सर्वप्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. लष्करी ऑपरेशन्स महासंचालक १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील.”. त्यामुळे, भारत आणि पाकिस्तान यांच्या सुरू असलेल्या हल्ल्यांना पूर्णविराम मिळाला आहे.