• महिनाभरापूर्वीच गुन्हा दाखल : डीआयजी टी.पी. शेष यांचे स्पष्टीकरण

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमध्ये सध्या चर्चेत असलेल्या हिंडलगा कारागृहातील सीसीटीव्ही व्हिडिओबाबत उत्तर कारागृह विभागाचे डीआयजी टी.पी. शेष यांनी खुलासा केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फुटेज सुमारे महिनाभर जुने असून, त्या घटनेप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना डीआयजी शेष म्हणाले की, या घटनेचा तपास सध्या बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाकडून सुरू आहे. संबंधित सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनाच प्राप्त झाले असून, तपास पूर्ण करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश महासंचालकांनी दिले आहेत.

या प्रकरणात काही सीआयएसएफ कर्मचाऱ्यांचे वर्तन प्राथमिकदृष्ट्या निष्काळजीपणाचे असल्याचेही निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. महासंचालकांच्या सूचनेनुसार, पुढील दिवशी कारागृहात तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान १२ मोबाईल फोन, एक चार्जर तसेच चार सीमकार्ड जप्त करण्यात आले. उत्तर विभागातील विविध कारागृहांमध्ये आतापर्यंत एकूण ३४ मोबाईल फोन आढळून आल्याची माहिती डीआयजी शेष यांनी दिली.