बिजगर्णी : येथील निवृत्त शिक्षक गुरुवर्य एस. आर. मोरे यांनी आपल्या मूळ गावातील प्राथमिक शाळेला सुमारे २२ हजार रुपये किमतीचे कपाट भेट देत शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. साठ वर्षांपूर्वी याच शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले होते.

शाळेतील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी कपाटाची गरज असल्याचे मुख्याध्यापक पी. के. पाटील यांनी व्यक्त केल्यानंतर या उपक्रमाची पूर्तता झाली. शाळा हे ज्ञानाचे केंद्र असून आपल्याला घडवणाऱ्या संस्थेचे ऋण विसरू नये, या भावनेतून मोरे यांनी हा आदर्श उपक्रम राबवला.

या निमित्ताने शाळेत सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीसी कमिटीचे अध्यक्ष भाऊराव जाधव होते. विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी शाळेतील संस्कार हे आयुष्यभर उपयोगी पडतात, असे मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर ग्रामपंचायत उपाध्यक्ष महेश पाटील, संतोष कांबळे, पुंडलिक जाधव मनोहर बेळगावकर,निंगापा जाधव, बबलू नावगेकर, दयानंद यळूरकर, संतोष दरेकर, सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्याध्यापक पी. के. पाटील, आभार ॲड. नामदेव मोरे यांनी मानले. सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.