बेळगाव / प्रतिनिधी
नव्या कंत्राटदाराने पदभार स्वीकारल्यानंतर कामगारांच्या मागण्या दुर्लक्षित केल्या जात असल्याचा आरोप करत, भारतीय टेलिकॉम मजदूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तीव्र आंदोलन केले.
कामगार संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन कंत्राटदार आल्यापासून अनेक कामगारांना कामावरून वंचित ठेवण्यात आले आहे. या सर्व कामगारांना त्वरित पुनर्नियुक्ती द्यावी आणि संघटनेच्या कार्यात सहभागी झाल्यामुळे कोणालाही नोकरीवरून कमी करू नये, अशी मागणी करण्यात आली.
तसेच, कामगारांना कायद्यानुसार हक्काच्या सुविधा — साप्ताहिक सुट्टी, राष्ट्रीय व सणांच्या दिवशी विश्रांती, दररोज ८ तासांची कामाची मर्यादा आणि ओव्हरटाईमसाठी योग्य मोबदला — देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय आणि अपघात विमा देणे अनिवार्य करावे, तसेच कामावर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, असेही संघटनेने नमूद केले.
फील्डमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने आणि उपकरणे वेळेवर उपलब्ध करून द्यावीत, तसेच इंडस टॉवर्स कंपनीने आपल्या सर्व कंत्राटी कामगारांना कायदेशीर संरक्षण मिळेल याची खात्री द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, “न्याय्य वेतन व सर्वांसाठी समान वेतन प्रणाली लागू न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
यावेळी सतीश निलजकर, भगवंत माने शिंदे, सुनील बोमनहळ्ळी, शंकर गुरुबसप्पागौडा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.








