बेळगाव / प्रतिनिधी

मुसळधार पावसामुळे नदीच्या प्रवाहात वाढ झालेली असताना दुचाकीसह पाण्यात वाहून गेलेल्या वॉटरमॅनचा मृतदेह आज तब्बल चार दिवसांनी हाती लागला.

बेळगाव जिल्ह्यातील तारिहाळ ग्रामपंचायतीच्या पेयजल युनिटमध्ये वॉटरमन म्हणून काम करणारे सुरेश निजगुणी गुंडण्णवर (वय ५१) हे गेल्या ६ ऑगस्ट रोजी चंदनहोसूर येथून पाईपलाईन दुरुस्त करून परतत होते. यावेळी सायंकाळी ७.३० वा. सुमारास तारिहाळ गावाजवळ नदीचा प्रवाह वाढल्यामुळे ते आपल्या टीव्हीएस दुचाकीवरून नदी ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. दुसऱ्या दिवशी ७ ऑगस्ट रोजी त्यांची मोटारसायकल नदी पात्रातच, अपघाताच्या ठिकाणापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर सापडली होती. त्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून एसडीआरएफच्या टीमकडून नदीपात्रात सुरेश यांचा शोध सुरु होता. दरम्यान आज रविवार दि. १० ऑगस्ट रोजी या मोहिमेला यश आले आणि वाहून गेलेल्या ठिकाणापासून सुमारे ८ किमी अंतरावर असलेल्या गनिकोप्प गावाजवळ त्यांचा मृतदेह आढळला. एसडीआरएफच्या टीमने मृतदेह सुरक्षितपणे नदीबाहेर काढून बैलहोंगल पोलिसांकडे सोपविला आहे.