• नागरिकांचे शहर पोलीस आयुक्तांना निवेदन

बेळगाव / प्रतिनिधी

खडकगल्लीत झालेल्या दगडफेकीच्या घटनेमागील खरे गुन्हेगार शोधून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आज शहर पोलिस आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी हिंदू-मुस्लिम ऐक्य टिकवावे अशा मागणीचे निवेदन शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांना देण्यात आले.

नागरिकांनी सांगितले की, मिरवणुकीला कोणताही विरोध नव्हता. खडकगल्लीत दोन्ही समुदाय अनेक वर्षांपासून शांततेत आणि सौहार्दाने राहतात. मात्र काही बाहेरून आलेल्या व्यक्तींनी मिरवणुकीचा मार्ग बदलून गोंधळ निर्माण केला आणि भडकावू घोषणा देऊन तणाव वाढवला. तरीसुद्धा पोलिसांनी मूळ गोंधळ घालणाऱ्यांना अटक न करता, निर्दोष लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे निर्दोषांवरील कारवाई मागे घेऊन खरे गुन्हेगार ओळखून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

या निवेदनानंतर नागरिकांशी संवाद साधताना पोलिस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले, “पोलिसांकडून कोणत्याही निरपराध व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली नाही. सर्व कारवाई पुराव्यांच्या आधारेच केली जात आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. पोलिसांवर विश्वास ठेवा आणि सहकार्य करा. विभागाकडून निष्पक्ष तपास करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.