बेळगाव / प्रतिनिधी
स्वतःच्या श्रेणीत भारतातील प्रथम मानांकित टेबल टेनिसपटू असलेली बेळगावच्या डिव्हाईन प्रोव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी १४ वर्षीय प्रतिभावान टेबल टेनिसपटू कु. तनिष्का काळभैरव हिने काल मंगळवारी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली.
असता त्यांनी तिची मुक्तकंठाने प्रशंसा करून भावी कारकिर्दीसाठी आशीर्वाद देऊन मार्गदर्शन केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धांमध्ये तनिष्का हिने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तिचे हार्दिक अभिनंदन केले. तनिष्का हिच्या अपवादात्मक सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरीने आणि विशेषतः तिच्या सध्याच्या क्रमवारीने जिल्हाधिकारी प्रभावित झाले. तनिष्का काळभैरव मानांकनात भारतात क्रमांक १ वर आणि आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये जगातील १२ व्या. मानांकनावर आहे. तिच्या प्रमुख कामगिरीबद्दल कालच्या भेटी प्रसंगी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तनिष्काला म्हैसूर, हाँगकाँग आणि वडोदरा (गुजरात) येथे होणाऱ्या तिच्या आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी देशाला अधिक गौरव मिळवून देण्याच्या आणि भारतातील तरुण खेळाडूंसाठी आदर्श म्हणून तिचा प्रवास सुरू ठेवण्याच्या तिच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला. या शाबासकी आणि प्रोत्साहनाने भारावून गेलेल्या तनिष्काने मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. तिने प्रत्येक सामन्यात १०० टक्के उत्कृष्ट योगदान देण्याचे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सुवर्णपदक जिंकून देण्याचे वचनही दिले.
तनिष्का हिला शहरातील मातब्बर ज्येष्ठ टेबल टेनिस प्रशिक्षक श्री. संगम बैलूर यांचे मार्गदर्शन तसेच वडील कपिल कालभैरव, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, मल्लेश चौगुले आणि संतोष ममदापूर यांच्यासह समर्थकांचे अढळ प्रोत्साहन लाभत आहे.









