• रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे विविध कार्यक्रम संपन्न

बेळगाव / प्रतिनिधी

स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमणादरम्यान बेळगावला दिलेल्या ऐतिहासिक भेटीला यंदा १३३ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

स्वामी विवेकानंदांनी बेळगावातील रिसालदार गल्लीतील भाते यांच्या निवासस्थानी तीन दिवस वास्तव्य केले होते. त्या वास्तव्याच्या ठिकाणीच आता स्वामी विवेकानंद स्मारक उभारण्यात आले आहे. स्वामीजींनी वापरलेले आरसे, खाट, काठी आणि इतर वस्तू आजही तेथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रप्रदर्शनही मांडण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळपासून स्मारकात कार्यक्रमांची सुरुवात झाली. सकाळी पूजा व धार्मिक विधी पार पाडले गेले, त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सायंकाळी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाला. पुण्याचे कलाकार दामोदर रामदासी यांनी सादर केलेल्या ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ या एकपात्री प्रयोगाने कार्यक्रमाची सांगता झाली.