बेळगाव : स्वामी समर्थांच्या पालखीचे आज सायंकाळी हट्टीहोळ गल्ली, शहापूर इथून महाद्वार रोड येथील स्वामी समर्थ आराधना केंद्र येथे सायंकाळी साडेपाच वाजता आगमन झाले. स्वामी समर्थ आराधना केंद्राचे नारायण पाटील, सुनील चौगुले आणि इतर भक्तानी जल्लोषात स्वागत केले. ज्ञानेश्वरी भजनी मंडळ हंदिगणूर यांनी टाळ मृदंगाच्या गजरात वातावरण उत्साही बनवले. उपस्थितानी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. मार्केटचे पोलीस निरीक्षक जे एम कालिमिरची यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर महाद्वार रोड परिसरात परिक्रमा करून पालखी तानाजी गल्लीतून येऊन स्वामी समर्थ आराधना केंद्रात विसावली. वाटेत अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी तसेच आरती करून पालखीचे स्वागत करण्यात आले. रस्ते भगव्या पताका आणि रांगोळ्यांनी सजविले होते.शेकडो अबालबुद्ध सहभागी झालेल्या या परिक्रमेमुळे परिसरातील वातावरण अध्यात्मिक बनले होते .
शेकडो भक्तांनी येऊन पादुकांचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी अनंत लाड, मधु गुरव, विकास मजुकर, प्रसाद नार्वेकर, राहुल मुचंडी, जितेंद्र बामणे, संजू हिशोबकर, अशोक बामणे, रवी मोरे, संजय बर्डे, राजेश गोजगेकर, श्रीपाद पाटील, अंकुश शाह , भाऊसाहेब कनबरकर , सुनील यादव, रवींद्र पाटील, किशोर गरगट्टी, भाऊ मंडोळकर, उदय अष्टेकर,माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेविका वैशाली हुलजी व पार्वती भातकांडे, विजया चौगुले, लक्ष्मीनारायण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
- अध्यात्मक समाजाला तारणार : कालीमिर्ची
“योग ध्यान आणि अध्यात्म या तीन गोष्टीच समाजाला तारणार आहेत. तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे ती टाळायची तर अध्यात्माची सुरुवात घराघरातून झाली की मुलांवर चांगले संस्कार होतील व अनिष्ट गोष्टींना आळा बसेल” असे मत मार्केटचे पोलीस निरीक्षक जे एम कालिमिरची यांनी पालखी पूजन नंतर कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केले.
- उद्या पालखी खासबागमध्ये :
उद्या बुधवार दि. 21 रोजी पहाटे श्रीमूर्ती व पादुकांचा महाअभिषेक झाल्यानंतर पालखी खासबागला रवाना होईल. खासबाग ओमनगर येथील दीपक खोबरे यांच्या निवासस्थानी अभिषेक, पुजा , आरती होणार आहे. तर सायंकाळी टिळकवाडी येथील समृद्धी शिंदे यांच्या निवासस्थानी पालखीचा मुक्काम राहिल.








