बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावात उद्या (सोमवार) पासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली आहे. तब्बल दहा दिवसांचे हे अधिवेशन सुवर्ण विधानसौध येथे पार पडणार असून, सकाळी सभाध्यक्षांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून अधिवेशनाची औपचारिक सुरुवात होईल.

यंदाही सुवर्ण विधानसौध आकर्षक रोषणाईने उजळून निघाले आहे. अधिवेशन काळातील सर्व कामकाजावर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन स्वतः लक्ष ठेवून आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ४.५ कोटी रुपयांच्या निधीतून सुवर्ण विधानसौध परिसरात भव्य उद्यान विकसित करण्यात आले असून, त्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मंत्री, आमदार, अधिकारी व मान्यवरांसाठी ३ हजार खोल्या तसेच ७०० वाहने राखीव ठेवण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांसाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली आहे.

अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी ७ ते ८ हजार पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून, विधानसौधपासून ३ किमी परिसरात जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. आंदोलनांसाठी दोन स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आल्या असून, पोलीस प्रशासन त्यावर देखरेख ठेवणार आहे.