खानापूर / प्रतिनिधी

चोर्ला घाट रोडजवळ दरीत सुमारे ६० फूट खोल एक संशयास्पद मोठी बॅग सापडल्याची माहिती फेसबुक फ्रेंड सर्कलच्या सदस्यांनी पोलिसांना दिली.

बेळगाव ते चोर्ला प्रवास करत असताना, बेळगाव येथील फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे अवधूत तुडवेकर यांना एक संशयास्पद मोठी बॅग आढळली. लागलीच त्यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर आणि पद्मप्रसाद हुली यांना माहिती दिली. यानंतर त्यांनी तातडीने जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाला कळवले आणि बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

दरम्यान खानापुरचे पोलीस निरीक्षक के. व्ही. कुलकर्णी, सहाय्यक उपनिरीक्षक एन. के. पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते परशुराम चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन बॅगेची तपासणी केली असता,  त्यातून दुर्गंधी येऊ लागली. तेव्हा बॅग उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये मांस (मटण) आढळले. पोलिसांकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, ते मांस सुमारे २ ते ३ दिवसांपूर्वी तिथे फेकण्यात आल्याचा संशय आहे.